भंगाराची चोरी करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

0

बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात करत होता चोऱ्या
जळगाव- एमआयडीसी भागातील सेक्टर बी मधील रूखमाई इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारातून भंगार चोरी प्रकरणात अटकेतील सराईत गुन्हेगार यासीन खान मासून खान मुल्तानी (रा. मास्टर कॉलनी) व जगन गोविंदा चौधरी यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता दोघांना सुनावणीअंती १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लवकरच यासीन यास दुसऱ्‍या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस अटक करणार आहेत.

७ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता रूखमाई इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारातून भंगार चोरीला गेला होता. हा प्रकार कंपनीतील दीपक चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर दिलीप जोरसिंग राठोड, यासीन खान मासुम खान मुलतानी, अमोल टोंगळे, राजु प्रकाश देशमुख, जगन गोविंदा चौधरी यांच्या विरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दिलीप राठोड, अमोल टोंगळे, राजु देशमुख हे तिघे सध्या कारागृहात आहेत. दरम्यान, अनेक दिवसांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार यासीन मुलतानी हा देखील अजिंठा चौफुलीजवळ मिळून आला़ तर बुधवारी दुपारी 1.30 वाजता पाचवा संशयित जगन चौधरी याला देखील एमआयडीसी पोलिसांनी शिवाजीनगरातून अटक केली. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यासीनवर या ठिकाणी आहेत गुन्हे दाखल
यासीन मुलतानी हा ट्रकांची तोडफोड, चोरी तसेच परस्पर विल्हेवाट लावण्यात पटाईत असून त्याच्याविरूध्द अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यासीनच्या मागावर पोलीस होती़ अखेर मंगळवारी त्याला पकडण्यात यश आले. यासीन याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात १, शहर पोलीस ठाण्यात १ तसेच रायगड जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात १ तसेच हिंगोली पोलीस ठाण्यात १ यासह आणखी तीन पोलीस ठाण्यांमध्ये असे एकूण १२ ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडी संपताच यासीन याला एमआयडीसी पोलीस दुसऱ्‍या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहेत.