भादली गावाजवळ शेतातील घटना : शेतातील जाळलेल्या कचर्यामुळे आग लागल्याची शक्यता
जळगाव- शेतात जाळण्यात येत असलेल्या कचर्याची ठिणगी वार्याने उठून शेतातील गोदामाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. भिषण आगीत चार क्विंटल जुने कापड, रबर, प्लॅस्टीक साहित्य यासह भंगार साहित्य असा एकूण दीड लाखांचा माल खाक झाला आहे. रस्त्यावरुन ये जा करणार्या नागरिक तसेच इतर शेतांमधील शेतकर्यांमुळे प्रकार वेळीच लक्षात आल्याने अग्निशमन बंबाला पाचारण करुन आग आटोक्यात आली.
भादली येथील माजी सरपंच मनाहेर हरी महाजन यांचे गावाच्या काही अंतरावर शेत आहे़ त्या शेतात पत्र्याचे गोदाम बनविण्यात आले आहे़ मात्र, हे गोदाम गेल्या काही महिन्यांपासून गावातील त्र्यंबक ठोसर या भंगार व्यावसायिकास भाड्याने दिले आहे़ ठोसर हे भंगाराचे साहित्य घेऊन त्याची विक्री करतात़ त्यानुसार गोदामात तीन ते चार क्विंटल जुने कापड, रबर, प्लॅस्टीक साहित्य यासह भंगार साहित्य ठेवलेले होते़ या गोदामाच्या शेजारीच हरिष देवराम चौधरी यांचे शेत आहे़ गहु काढल्यामुळे त्या शेतात कचरा गोळा झाला होता़ तो कचरा शुक्रवारी दुपारी जाळण्यात आला़ या कचर्याची ठिणगी उडून ही गोदामाच्या साहित्यावर पडल्यामुळे भंगाराला आग लागली़
ग्रामस्थांनी घेतली घटनास्थळाकडे धाव
गोदामाला आग लागल्यामुळे गोदामातून धुर निघत होता़ हा प्रकार रस्त्यावरून ये-जा करणाजया गावातील काही ग्रामस्थांना दिसला़ त्यांनी त्वरीत शेतमालक मनोहर महाजन यांच्या घरी धाव घेत घटनेची माहिती दिली़ त्यांनी त्वरीत त्र्यंबक ठोसर यांना आगीबाबत माहिती दिल्यानंतर ठोसर व महाजन यांच्यासह काही ग्रामस्थांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली़
अग्निशमन बंबामुळे आग आटोक्यात
गोदामातील आग विझविण्यासाठी महाजन यांच्यासह ठोसर यांनी प्रयत्न केले़ आगीमुळे पत्रे तापल्यामुळे आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. तत्पूर्वी घटनेची माहिती अग्निशमन कार्यालयाला देण्यात आल्यामुळे अर्धा ते पाऊण तासानंतर बंब देखील घटनास्थळी दाखल झाला़ त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा करत आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले़ अर्धा ते एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
आगीमुळे संपूर्ण परिसरात धूरच धूर
आगीत संपूर्ण भंगार साहित्य जळून खाक झाला़ सुमारे दीड लाखाचा माल या आगीत जळून खाक झाल्याचे ठोसर यांनी सांगितले़ दरम्यान, नुकसानाच्या आकडेवारीत वाढ होऊ शकते असेही त्यांनी सांगितले़ आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी हजर झाल होते़ आगीमुळे संपूर्ण परिसरात धुर पसरला होता