भंगारातील विमानाचे अवशेष मिळवून देण्याच्या नावाखाली दिड कोटीत ठगवले : एकाला अटक

धुळे : संरक्षण विभागाने भंगारात काढलेली विमाने व त्यांच्या साहित्याची डील होईल तसेच माइल्ड स्टील प्लेटचीही डील होईल. त्यात गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांच्या आत 50 टक्के नफ्याने परतावा मिळले, असे आमिष दाखवून सुमारे एक कोटी 41 लाख 50 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील एकाच्या जळगावातील अजिंठा चौफुली भागातून मुसक्या आवळण्यात धुळे आर्थिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपीला न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उबेर अहमद उर्फ इद्रीस अहमद जमील शेख (29, रा.सालारनगर, लिजा अपार्टमेंट, अजिंठा चौफुली जवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याचा दुसरा साथीदार जुनेद अहमद जमील शेख अद्यापही पसार आहे.

तब्बल दिड कोटींचा घातला गंडा
आरोपींनी नॅशनल स्क्रॅप फर्मच्या माध्यमातून भंगार मालाची डील करणार असल्याचे सांगितले तसेच यात गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांच्या आत 50 टक्के नफ्याने परतावा देऊ, असे आमिष दाखवून लोकांची तब्बल दीड कोटीत फसवणूक केली होती. लोकांना कालांतराने कोणत्याही प्रकारचा परतावा न देता त्यांची मुद्दल रक्कम सुद्धा परत करण्यास टळाटाळ आली. पीडित गुंतवणूकदारांची एक कोटी 41 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक व अपहार केल्याची तक्रार चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात मार्च महिन्यात शेख आफताब शेख हुसेन (46,, आविष्कार कॉलनी) यांनी तक्रार नोंदवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग झाला.