वाघूर डॅमवरून लांबवले दिड लाखांचे व्हॉल्व्ह ; भंगारच्या विल्हेवाटीनंतर शहरात होता दरोड्याचा डाव
भुसावळ- भंगार चोरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या टोळीचा बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमीयरजवळ मुसक्या आवळल्या. आरोपी भंगारची विल्हेवाट लावल्यानंतर शहरातील विकास कॉलनीत दरोडा टाकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सचिन दशरथ दोळे (26, रा.दिनकर नगर, जळगाव), ज्ञानेश्वर डीगंबर दोळे (22), महेंद्र भीमराव कोळी (25), मनोज हरी तायडे (22), योगेश रतन डोळे वय (19) यांना अटक करण्यात आली तसेच एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
चौकशीत दिली चोरीची कबुली
आरोपींच्या ताब्यातून लोखंडी टॉमी, पकड, स्क्रू ड्रायव्हर, दोन हजारांची रोकड, 45 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी मिळून 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपींनी एक लाख 52 हजार रुपये किंमतीचे 19 लोखंडी व्हॉल काढून दिले. संशयीतानी वाघूर डॅम प्रकल्पावरून हे साहित्य चोरल्याचे समजते.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ डीबी पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग, एएसआय अंबादास पाथरवट, हवालदार सुनील जोशी, नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, सचिन चौधरी, योगेश माळी, विनोद वितकर, संदीप परदेशी, विकास सातदिवे आदींनी ही कारवाई केली.