भंगार विक्रीच्या बहाण्याने व्यापार्यास लुटले
चारचाकीतून जंगलात नेत दोघांना मारहाण करीत केली तीन लाखांची लूट : 15 संशयीतांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा
भुसावळ : स्वस्तात भंगार विक्री करण्याच्या बहाण्याने मुंबईतील व्यापार्याला मुक्ताईनगरनजीकच्या जंगलात नेवून मारहाण करण्यात आली व व्यापार्यासह त्याच्या साडूच्या ताब्यातील 25 हजारांच्या रोकडसह सुमारे तीन लाखांच्या मुद्देमालाची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार, 14 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात 15 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, व्यापार्यांना लुटणारी ही टोळी कार्यरत असल्याचा दाट संशय असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
स्वस्तात भंगारच्या आमिषाने गंडवले
भाईंदर येथील तक्रारदार व्यापारी संदीप प्रभूलाल वाणीगोटा यांना कमी किंमतीत भंगार देण्याचे आमिष दाखवत संशयीताने दिल्यानंतर वाणीगोटा हे त्यांचे साडू दिनेशकुमार चंपालाल जैन यांना घेवून रेल्वेने 14 रोजी भुसावळात आले. संशयीतांनी उभयंतांना घेण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी पाठविली. मुक्ताईनगरातील एका फॅक्टरीत माल असल्याचे सांगून संदीप वाणीगोटा व दिनेशकुमार जैन यांना चारचाकीतून सुरुवातीला मुक्ताईनगरात नेण्यात आले त्यानंतर शहराजवळील कुर्हाकाकोडा येथे फॅक्टरी असल्याचे सांगत संशयीतानी 14 ऑगस्टला सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास कुर्हा काकोडाच्या जंगलात नेले. यावेळी दुचाकीवर 10 ते 15 संशयीत आल्यानंतर त्यांनी दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली व वाणीगोटा व जैन यांच्याजवळील सोन्याचे दागिणे, घड्याळ, मोबाईल आणि रोख 25 हजारांची रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर दोघांनी कसे-बसे मलकापूर गाठले व तेथून ते रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले. मुंबई पोलिसांना त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळ भुसावळ असल्याचे सांगत तेथे गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. बुधवार, 18 रोजी सायंकाळी वाणीगोटा भुसावळ येथून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची भेट आपबिती सांगितल्यानंतर रात्री 11 वाजता बाजारपेठ पोलिस ठाण्यात लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या संशयीतांविरोधात दाखल झाला गुन्हा
वाणी गोटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात बलविीर, विक्रम, शरीफ यांच्यासह 10 ते 15 जणांविरूध्द लूटीचा गुन्हा दाखल केला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे व सहकारी तपास करीत आहेत.