कर्मचार्यांच्या संपामुळे लिलाव ढकलला होता पुढे
वल्लभनगर आगार, दापोडी कार्यशाळेत गाड्या दाखल
पिंपरी-चिंचवड : वेतनवाढ करार मान्य नसल्याचे सांगत एसटी कर्मचार्यांच्या संपाचे हत्यार उगारले होते. यामुळे महामंडळाकडून भंगार झालेल्या सुमारे 130 बसगाड्यांचा लिलाव लांबणीवर पडला होता. आता हा लिलाव 21 जूनला होण्याची शक्यता आहे. स्वारगेट येथे भंगार गाड्यांना उभ्या करायला जागा पुरत नसल्याने 42 गाड्या वल्लभनगर आगारात ठेवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या दापोडीतील वर्कशॉप येथे उभ्या केल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी जागेचा अभाव असताना कसेबसे या गाड्यांचा भार आगार प्रशासन संभाळत आहेत.
लिलावातून करोडोचे उत्पन्न
संपूर्ण जिल्ह्यातून वैधता संपलेल्या गाड्या पुण्यातील मुख्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात जमा होतात. ठराविक काळानंतर गाड्यांचा लिलाव करण्यात येतो त्यातुन करोडोचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते. यापूर्वी जानेवारी 2018 मध्ये लिलाव झाला होता. त्यातुन महामंडळाला सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. एसटी महामंडळाकडून दरवर्षी भंगार गाड्यांचा लिलाव करण्यात येतो. कर्मचार्यांच्या संपामुळे यावेळचा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. 21 जूनला हा लिलाव होण्याची शक्यता आहे.
सुट्या भागांची होते चोरी
भंगारात जमा झालेल्या व वैधता संपलेल्या गाड्या स्वारगेट येथे जमा केल्या जातात. नंतर गाड्यांचे महत्त्वाचे भाग काढून घेऊन नंतर भंगार म्हणून लिलाव करण्यात येतो. भंगारात जमा झालेल्या वाहनांच्या स्पेअर पार्टच्या चोरीची भीती असते. रत्नागिरी येथील आगारात लिलावाच्या दिवशीच भंगार मालाला आग लागण्याची घटना घडली होती. त्यामुळे एसटी प्रशासन धास्तावले आहे.