भंडारा-गोंदिया : भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असून पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 31 मे रोजी जाहीर होईल. या निवडणुकीत एकूण २ हजार १२६ मतदान केंद्र असून १७ लाख ४८ हजार ६७७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी 9 वाजेपर्यंत पाच टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार असून नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनी तालुक्यात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच असेल.
राष्ट्रवादी व भाजपात प्रमुख लढत
गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी १२ डिसेंबर २०१७ रोजी राजीनामा दिला होता. १४ डिसेंबर २०१७ रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.
ईव्हीएम मशिन्स बंद
भंडाऱ्यातील लाल बहादूर शास्त्री शाळेत ईव्हीएम बंद पडल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यात आला. तुमसर तालुक्यातील खरबी, हिंगणा, मांढळ आणि खापा मध्ये ११ ईव्हीएम मशिन्स बंद पडले.