भंडार्‍यातून 18 लाखांचे टायर्स लांबवले : वरणगावात आवळल्या आरोपींच्या मुसक्या

0

गोडावून किपरच निघाला आरोपी : नाकाबंदीत ट्रक झाला जप्त

भुसावळ- भंडार्‍यातील टायर्सच्या गोदामातून 18 लाखांच्या टायर्सची रविवारी रात्री चोरी झाली होती. या प्रकरणी गोदाम मालक अरुण गंगासागर गुप्ता (सिव्हील वॉर्ड, साकोली) यांनी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींबाबत राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांकडून नाकाबंदी करून संशयीत ट्रकचा शोध जारी करण्यात आला होता. गुन्ह्याच्या चार दिवसानंतर संशयास्पद ट्रक वरणगावातून जात असताना नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेण्यात आल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात गोडावून किपरच आरोपी निघाला असून मालक शहरात नसल्याची संधी साधत त्याने जळगावातील ट्रक चालकाच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. शुभम अशोक तायडे (जवाहर नगर, भंडारा, मूळ रा. आहुजा नगर, जळगाव) व ट्रक चालक संभाजी पंडित पाटील (आहुजा नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींचे नावे आहेत.

चोरीनंतर महाराष्ट्रात अलर्ट
भंडार्‍यातील टायरच्या गोदामातून आरोपी शुभम तायडेने मालक शहरात नसल्याची संधी साधत जळगावातील आहुजा नगरातील रहिवासी असलेल्या ट्रक चालक संभाजी पाटीलला बोलावून घेत बनावट चाव्यांद्वारे गोदामातील सुमारे 15 ते 18 लाख रुपये किंमतीचे 500 नग टायर्स रविवारी रात्री लांबवले होते. सोमवारी गोदाम मालक अरुण गुप्ता यांना ही बाब कळताच त्यांनी भंडारा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली होती तर त्यानंतर महाराष्ट्रभर अलर्ट जारी करण्यात आला होता. आरोपी ट्रक (एम.एच.18 बी.जे.3206 व एम.एच.18 बी.जे.0507) ने पसार झाल्याची प्राथमिक माहिती असल्याने सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आली होती.

वरणगावातील नाकाबंदीत अडकले आरोपी
वरणगाव पोलिस ठाण्यालाही दूरनियंत्रण कक्षातून अलर्ट मिळाल्यानंतर बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावण्यात आली. नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक पठाण, नागेंद्र तायडे, मेहरबान तडवी, एएसआय कुलकर्णी आदींनी नाकाबंदी करीत संशयास्पद ट्रक अडवला. संशयीतांकडे ट्रकची कुठलेही कागदपत्रे नव्हती तसेच टायर्सबाबत मालकी हक्क सादर करता न आल्याने खोलवर चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. भंडारा पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर आल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांनी आरोपींचा ताबा घेतला.