भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचा जुना आराखडा रद्द करा

0

पिंपरी-चिंचवड : मेट्रो तसेच इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा विचार न करताच निगडी, भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जुना आराखडा रद्द करण्यात यावा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, रचनात्मक बदल करून नियोजित मेट्रो आणि भविष्यातील प्रकल्पांबाबत दूरदृष्टी ठेऊन नव्याने आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे. महापालिकेने नव्याने आराखडा तयार करून मेट्रो कंपनी, शासन यांच्याकडून त्याबाबत मंजुरी घेऊनच ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम सुरू करावे. अन्यथा महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

भक्ती-शक्ती वाहतुकीचे हब होणार
या विषयासंदर्भात थोरात यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यात पिंपरी ते निगडी दरम्यानचे काम होणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो मार्ग विस्तारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिंजवडी आणि तळवडे दरम्यान मोनोरेलची आवश्यकता असल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. त्यामुळे हिंजवडी ते तळवडे दरम्यान मोनोरेल किंवा मेट्रो प्रकल्प होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांतर्गतचा मोनोरेल किंवा मेट्रोचा मार्गही भक्ती-शक्ती चौकातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भक्ती-शक्ती चौकात सार्वजनिक वाहतुकीचे ‘हब’ होणार आहे. ही लक्षात घेता भक्ती-शक्ती चौकातील प्रत्येक प्रकल्पाची उभारणी रचनात्मक आणि दूरदृष्टी ठेवून होणे आवश्यक आहे.

भविष्यात अडचणी येणार
भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारताना या सर्व तांत्रिक बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. अन्यथा उड्डाणपूल किंवा ग्रेडसेपरेटर अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे नियोजित आणि भविष्यातील प्रकल्पांचा विचार करून भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा जुना आराखडा रद्द करून नव्याने तयार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.