जळगाव । भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानपासून शोभायात्रेला सुरवात झाली. या ठिकाणी श्रीराम मंदिर संस्थानचे हभप मंगेश महाराज जोशी, गजानन जोशी, श्रीकांत खटोड, सुरेंद्र मिश्रा, लेखराज उपाध्याय, विश्वनाथ जोशी, अशोक वाघ, संजय कुळकर्णी यांच्या उपस्थितीत भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पुजन करून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रा सराफ बाजार, भवानी माता मंदिर, सुभाष चौक, दाणाबाजार, नवीपेठ, गुजराथ स्विटमार्ट मार्ग बालगंधर्व सभागृह येथे शोभायात्रेचा समारोप झाला.
मिरवणुकीत संतवाणी आणि विररसाचे चित्रप्रदर्शन
शोभायात्रेत चिमुकल्यांनी साकारलेल्या संताच्या वेशभुषे फेटेधारी महिला, ढोल- लेझीम पथकाने जळगावकरांचे लक्ष वेधले. शोभायात्रेत फेटेधारी महिला, तरुणी, चिमुकले, वृध्दांची लक्षणीय उपस्थिती होती. शोभायात्रेत चिमुकल्यांनी भगवान परशुराम, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, आचार्य चाणाक्य, झाशीची राणी, बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, आनंदीबाई जोशी, सुषमा स्वराज, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या वेशभुषा साकारल्या होत्या. या चिमुकल्यांच्या वेशभुषेने उपस्थितांचे लक्ष वेधले. शोभायात्रेत श्रीमंत बाजीराव पेशवा व राणी लक्ष्मीबाई असे दोन ढोल पथक सहभागी झाले होते. दोन्ही पथकात 75 ढोल व 15 ताशांचे महिला, तरुणीचे ढोल व लेझीम पथक होते. फेटेधारी ढोल व लेझीम पथकातील महिला व तरुणींनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याने महिलांचे ढोल व लेझीम पथक शोभायात्रेचे आकर्षण ठरले. शोभायात्रेत जय परशुराम लिहीलेल्या भगव्या टोप्या सर्वांनी घातल्या होत्या. महिलांनी फेटे घातले होते तर पुरुषांनी पारंपरिक वेषभुषा करुन पुणेरी पगड्या घातल्या होत्या. मिरवणूक दाणा बाजार चौकात आल्यानंतर तरुणींनी दाणपट्टा, तलवारबाजी, लाठ्या-काठ्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. तरुणींनी अतिशय चित्तथरारक कसरतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.