जैन महासंघाच्यावतीने राबविणार उपक्रम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्यावतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त 23 ते 29 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी कासारवाडी येथील पगारिया सभागृहात अहिंसा सप्ताह व नवकार महामंत्र जपाने उत्सवाचा शुभारंभ झाला. 24 मार्चला निगडी येथे भगवान महावीर जैन मंदिरामध्ये महिलांसाठी पाक कला व रांगोळी स्पर्धा व दापोडी येथे जैन स्थानकामध्ये महावीर स्तोत्र व महावीर चालीसा पठण होईल. दि. 25 मार्चला केसुबाई बंधारा, बोट क्लब थेरगाव येथे नदी स्वच्छता अभियान, पारस भवन उद्योग नगर येथे मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, अजमेरा सोसायटीत महावीर अष्टकम स्तोत्र, चिंचवड गाव गांधी पेठ येथे रक्तदाब शिबीर, 26 मार्चला आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने निबंध स्पर्धा, जैन मंदिर सांगवी येथे महामंत्र जप व दि.27 मार्चला यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप, दि. 28 मार्चला जैन मंदिर निगडी येथे सायं. 6 वाजता ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे यांचे जागतिकीकरणामध्ये अहिंसेचे महत्त्व’ विषयावर व्याख्यान, याच ठिकाणी सायंकाळी सात वाजता महावीर फूड बँकेच्या वतीने धान्य वाटप, अक्षय पाटील यांचा भक्तीगीत कार्यक्रम, दि. 29 रोजीला दिगंबर जैन मंदिर निगडी अरिहंत व जैन मंदिर चिंचवड, रामस्मृती लॉन्स भोसरी येथे रक्तदान व नेत्रदान शिबीर, मोहननगर येथे जैन वसतीगृह व मोरया मंदिर परिसरातील समरथ संस्था गुरुकुल येथे फळ वाटप, दि. 29 मार्चला महावीर जयंतीच्या मुख्य दिवशी दुपारी चार वाजता निगडी येथे जैन मंदिरात अहिंसा रॅली व अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे सायं. सहा वाजता समारोप होणार आहे.
याच ठिकाणी सायं. साडे सहा वाजता गायक हर्षित अभिराज यांचा भक्ती संध्या कार्यक्रम व अहिंसा पुरस्कार वितरण होईल. पिंपरी चिंचवड जैन श्रावक संघ, जैन टेम्पल ट्रस्ट, युवक मंडळ, महिला मंडळ यांनी आयोजन केले आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन महासंघाचे अध्यश वीरेंद्र जैन यांनी केले आहे.