जळगाव । भगवान महावीर यांच्या जीवनातील विचार जीवनात आत्मसात करणे गरजेचे आहे. समस्त जैन समाज भाग्यवान आहे कारण त्यांचा जैन धर्मात जन्म झाला आहे. समाजात एकता टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असून सर्व जाती धर्माला सोबत घेत वाटचाल करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी केले. भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन जैन समाज बांधवांनी केले आहे. यावेळी ते बोलत होते. जैन श्री. संघ सेवा समितीतर्फे महावीर जयंती निम्मिताने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 9 रोजी महोत्सवाचा समारोप करण्यात आला. व्यासपिठावर जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, जैन संघ पती दलुभाई जैन, खासदार ईश्वरलाल जैन, राजेश जैन, मनोज सुराणा, सुगनचंद राका, विलास जैन,अजय ललवाणी, मुंबई येथील डॉ. बपिनजी दोशी, रत्नाभाभी जैन, आर.सी. बाफना,कस्तुरचंद बाफना, प्रदीप मुथा, कणकमल राका आदी जैन समाजबांधव उपस्थित होते.
पाच वर्षानंतर व्यासपीठावर
शहरात जैन समाज बांधवाची संख्या मोठी आहे. या समाजात सुरेश जैन यांना आदराचे स्थान आहे. गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयीन कारणाने जैन हे पाचवर्षापासून शहरात नव्हते. त्यामुळे समाज बांधवांशी त्यांचा दिर्घकाळापासून संबंध होवू शकला नाही. आपण समाजापासून दुर गेलो असल्याचे खंत व्यक्त करीत त्यांनी आता आपल्या सोबत असल्याचं आनंद असल्याची भावना जैन यांनी व्यक्त केली. जैन व्यासपीठावर येताच समाज बांधवानी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
विवाह समारंभात देखावे नको
जैन समाजातील बहुतांश लोक हे व्यापारी असतात. त्यामुळे समाजातील विवाह समारंभात मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च केला जातो. समाजात अनेक जण गरीबीत जीवन जगत आहे. विवाह समारंभात होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच समारंभातील अनावश्यकखर्चावर निर्बंध घालण्यासाठी समाज बांधवानी सहकार्य करण्याचे आवाहन जैन समाज संघपती दलूभाऊ जैन,माजी मंत्री सुरेशदादा जैन ,जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांनी केले.
जळगावात संस्कारितांचा जन्म
जळगाव जिल्हा हा संतांच्या भूमीने पावन झालेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जळगावच्या मातीत संस्कारी लोकांनी जन्म घेतला आहे. तीन दिवसापासून मी मुंबई येथून जळगाव मध्ये दाखल झालो आहे. अनेक लोकांशी माझा संबंध आला आहे. जैन समाजातील संघटन पाहता मी भारावून गेलो असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापिठातील वक्ते प्रा बिपीन दोशी यांनी केले. भगवान महावीरांनी जैन समाजाला एक मोठी दिशा दिली आहे. त्यांच्याच विचाराने आज समाज वाटचाल करीत असून त्याचे विचार आताच्या नव्या पिढीने आचरणात आणण्याची गरज आहे.
महावीर रक्तदान शिबीर
सध्याच्या युगात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. महाविर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त जैन श्री संघ सेवा समितीच्या वतीने केशव स्मुतीच्या माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने महारासक्तदान शिबिराचे आयोजण करण्यात आले होते. समाज बांधवाचा रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. एकूण 158 समाज बांधवानी रक्तदान शिबिरात रक्तदान केले.
भगवान महावीरांचा जयघोष
रविवार 9 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती निमित्त जन्म कल्याण समिती तसेच जैन श्री.संघ सेवा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेला सुरुवात वासूपती महाविर मंदिरा पासून करण्यात आले होते. 7 .30 वाजता जैन समाजाच्या ध्वजारोहणा तसेच भगवान महावीरांचे पुजन करून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत स्त्री भ्रूण हत्या, महावीरांनी 12 अनुव्रत दिलेल्या तत्वाची प्रदर्शन जागृती, पाणी बचाव , अहिंसेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन करण्याचे संदेश देण्यात आले. ढोल पथक शोभायात्रेचे आकर्षण होते. शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.