भगवा फडकवण्यास शिवसैनिक सज्ज

0

हडपसर । रामटेकडी येथील कचरा डेपो, रखडलेली उड्डाणपुलांची कामे, वाहतूककोंडी आदी प्रश्‍नांमुळे जनता हैराण झाली आहे, भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक नागरिकांना एकमेकांकडे चकरा मारायला लावीत आहेत, नगरसेवकांमध्ये एकमेकांशी ताळमेळ नाही अशीच परिस्थिती सगळीकडे आहे. त्यामुळे जनता आता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली असून भगवा फडकवण्यास शिवसैनिक सज्ज झाले आहेत, असा विश्‍वास शिवसेनेचे नवनियुक्त पुणे उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी व्यक्त केला. येत्या विधानसभा निवडणुकीत हडपसर विधानसभेत भगवा फडकवण्यास शिवसैनिक सज्ज झाले असून सर्वांना एकत्र आणून घराघरात शिवसेना पोहोचवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. हडपसरमधील समस्यांनी उग्र रूप धारण केले असून या मतदारसंघात आमदार सेनेचा होईल असेही त्यांनी सांगितले. पुणे शहर उपशहरप्रमुखपदी नुकतीच तुपे यांची निवड झाली.

विकासकामे प्रलंबित असल्याने नाराजी
तुपे म्हणाले, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी हडपसरच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले आहे. मोदी लाटेमुळे या मतदारसंघात भाजपची सरशी झाली असली, तरी आज विकासकामे प्रलंबित असल्याने जनता नाराज झाली आहे. उपशहरप्रमुखपदी काम करत असताना आगामी काळात पुणे व हडपसर परिसरात शिवसेना तळागाळात मजबूत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपशहरप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तुपे यांचे सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यांनी अभिनंदन केले आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत, भाजप आमदार नुसते गाजर दाखवीत आहेत, विकास हरवला अशी परिस्थिती आहे, लोकप्रतिनिधींवर नियंत्रण नाही, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शहरप्रमुख महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन येथील प्रश्‍नांना वाचा फोडून प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे समीर तुपे यांनी यावेळी स्पष्ट केले.