भजी विकणे जॉब, तर भीक मागणेही नोकरी!

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भजी विकणे हासुद्धा जॉबच असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी जोरदार टीका केली आहे. भजी विकणे हा जॉब असेल तर भीक मागणे हीसुद्धा नोकरीच आहे, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. एखाद्या कार्यालयाच्या खाली एखादा व्यक्ती भजी विकत असेल तर तो रोजगार मानू नये काय? असा सवाल मोदींनी केला होता. मोदींच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली होती. सोशल मीडियावरही मोदींच्या या वक्तव्याची खिल्ली उडविण्यात आली होती. चिदंबरम यांनी ट्विटरवरून मोदींच्या या विधानाचा समाचार घेतला.

रोजगार निर्मितीत सरकार अपयशी
जर भजी विकणे हा रोजगार असेल तर मोदींच्या या तर्कानुसार भीक मागणे ही सुद्धा नोकरी समजली पाहिजे. त्यामुळे गरीब आणि अनाथांनाही नोकरदार समजले पाहिजे, अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे. रोजगार हमी योजना आणि सरकारच्या अन्य योजनांमधून रोजगार निर्मिती करण्यास सध्याचे सरकार अपयशी ठरल्याचेही चिदंबरम यांनी सांगितले. रोजगार हमी योजनेत काम करणार्‍या मजुरांना नोकरदार मानने पाहिजेत. असे एका केंद्रीय मंत्र्याचे म्हणणे आहे. असे असेल तर हे मजदूर 100 दिवस नोकरदार राहतील आणि 265 दिवस बेरोजगार राहतील, अशी टीका करतानाच मोदी सरकार केवळ नोकर्‍याच नाही तर रोजगार निर्मिती करण्यातही सपशेल अपयशी ठरल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.