नंदुरबार । भटके-विमुक्त हक्क परिषदेतर्फे शनिवार दि. 8 एप्रिल रोजी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. नंदुरबार शासकीय विश्रामगृह येथे दि.8 एप्रिल 2017 रोजी दुपारी 3 वाजता भटके विमुक्त हक्क परिषदेची जिल्हा बैठक घेण्यात येणार असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभाग मुख्य समन्वयक पुरुषोत्तम काळे तर नंदुरबार जिल्हा मुख्य समन्वयक सुपडू खेडकर व धुळे जिल्हा मुख्य समन्वयक साहेबराव गोसावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जिल्हा संपर्क अभियानाकरीता जन-जागर रथयात्रा
बैठकीत भटके-विमुक्त विशेष मागासवर्ग व इतर मागासवर्ग या नवीन निर्मित मंत्रालयासाठी शासनाने केलेली आर्थिक निधीची तरतूद, धनगर, भटके, ओबीसी यांचे सर्वांगिण विकासाकरीता केंद्र सरकारचे निर्धारित धोरण, याबाबत हक्क परिषदेची भुमिका, जिल्हा संपर्क अभियानाकरीता जन-जागर रथयात्रेचे आयोजन करणे, राष्ट्रीय इतर मागासवर्ग आयोगाच्या घटनात्मक दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित भुमिकेची माहिती घेणे व चर्चा करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. बैठकीस भटके विमुक्त प्रवर्गातील धनगर, बंजारा, वंजारी, भोई, गोसावी, चित्रकथी, कंजरभाट, वडार, वैदू, गवळी, लोहार, जोशी, गोंधळी, बेलदार, ठेलारी, छप्परबंद, तिरमळे, सिकलगर, मदारी आदींसह सर्व 51 जाती-प्रजातीतील समाज कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रतिनिधी, नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जगदिश चित्रकथी यांनी केले आहे.