भटक्या कुत्र्यांचा शहरात हैदोस !

महिन्याभरात जीएमसी मध्ये २६९ जणांनी घेतले इंजेक्शन

जळगाव- भटक्या कुत्र्यांचा शहरात हैदोस सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागांमध्ये मे महिन्यात २६९ नागरिकांनी कुत्रे चावल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व उपचार घेतले आहे.

२५ लहान बालकांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित झालेले आहे. मात्र नेत्र कक्ष (सी १) येथे आपत्कालीन विभाग सुरू ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी अपघात, हाणामारी, विषप्राशन व संबंधित रुग्ण प्राथमिक उपचार करण्यासाठी येत असतात. त्यासह भटक्या कुत्र्याचा चावा यावरही उपचार घ्यायला येतात. जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकुळ वाढला आहे. या आपतकालीन विभागांमध्ये मे महिन्यात एकूण २६९ व्यक्तींना कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात २०२ पुरुष, ४२ महिला, तर २५ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणार्‍यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. तसेच महिन्याभरात ६ रुग्णांना उंदीर, मांजर, डुक्कर व अन्य प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.