खडकी : विविध शासकीय योजनाचे अनुदान बंद करण्याच्या माध्यमातुन राज्यातील जातीयवादी युती सरकारने भटक्या विमुक्त समाजावर अन्याय केला आहे. तांडा वस्ती योजना, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ तसेच समाजाच्या शैक्षणिक सवलती शिष्यवृत्ती या विविध योजनांचे शासकीय अनुदान राज्य शासनाने बंद केले आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजावर मोठा अन्याय झाला आहे.
येत्या निवडणुकीत या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी येथिल कार्यक्रमाप्रसंगी दिला. राष्ट्रवादी पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेल पुणे शहर शाखेच्यावतीने नुकतेच बोपोडी छत्रपती शिवाजी उद्यान येथे भटक्या व विमुक्त समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राठोड उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सेलचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष विजय जाधव, उमा सोंडुर उपस्थित होते.
हे देखील वाचा
समाजातील महिलांना साडीवाटप
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नवनिर्वाचित पदाधिकार्यांना राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. मेळाव्यास टकारी, कैकाडी, पाथवट, वडारी, बंजारा, लमाण, फासेपारधी आदी भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. यावेळी समाजातील घटस्फोटीत, विधवा, निराधार, ज्येष्ठ, अपंग अशा सुमारे 500 महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता रवींद्र गायकवाड, विनोद गायकवाड, सचिन गायकवाड, अर्चना वैद्य, उमा सोंडुर, लता गायकवाड, सविता जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.