भडगावच्या तक्रारदारास पावणेदोन लाखांचा गंडा : हरीयाणातून आरोपी जाळ्यात

जळगाव सायबर सेलची यशस्वी कामगिरी : आरोपी व्यवसायाने फळ विक्रेता

जळगाव : बजाज फायनान्स कंपनीचे लोण देण्याच्या बहाण्याने भडगावच्या तक्रारदाराला तब्बल पावणेदोन लाखांचा गंडा घालण्यात आल्याची घटना 19 जानेवारी 2019 ते 6 फेब्रुवारी 2019 दरम्यान घडली होती. सायबर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे पुष्पेंदरकुमार रामदिन कनौजिया (29, लक्ष्मण बाग, ऑफिसर कॉलनी, कानपूर, ह.मु.गणेश चौक, मंडावली, दिल्ली) आरोपीच्या जळगाव सायबर सेलने मुसक्या आवळल्या आहेत.

फळ विक्रेत्याने ऑनलाईन गंडवले
भडगावातील यशवंत नगर भागातील रहिवासी सय्यद अलीम सय्यद शौकत पटवे (34) यांना 2019 मध्ये ऑनलाईन बजाज फायनान्स कंपनीचे लोण देण्याच्या बहाण्याने नेहा शर्मा, रोहित शर्मा, अनिकेत श्रावण, संचित जाधव या नावाने कॉल करून बनावट पॉलिसी पाठवण्यात आली व वेळोवेळी एक लाख 75 हजारांची रक्कम स्वीकारून आरोपीची फसवणूक करण्यात आली. सायबर शाखेचे उपनिरीक्षक अंगद नेमाणे व दिलीप चिंचोले यांनी या गुन्ह्याचे तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर सायबर सेलच्या पथकाने आरोपीच्या हरीयाणामधून मुसक्या आवळल्या. त्यास न्यायालयाने 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सायबर सेलचे निरीक्षक बळीराम हिरे, एएसआय बाळकृष्ण पाटील, हवालदार प्रवीण वाघ, अरविंद वानखेडे, पंकज वराडे आदींनी ही कामगिरी केली.