भडगाव (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील कजगाव येथे सोमवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी दोन घरांवर दरोडा टाकला. यामध्ये सोने, चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे ५ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. दरोडेखोरांनी ३ जणांना मारहाण केली, ज्यात दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे.
याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहेत.
कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी असलेल्या राजश्री नितीन देशमुख (वय ४८) ह्या घरात एकट्याच होत्या. सोमवारी पहाटे १ ते अडीच दरम्यान दरोडेखोरांनी त्यांचे घर उघडले आणि तलवार, लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली. या घरात साडेसात तोळे सोने आणि एक लाख रुपये रोख दरोडेखोरांनी घेतले.
यानंतर दरोडेखोरांनी काही अंतरावर असलेल्या कजगाव गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या घराकडे जाऊन त्यांची पत्नी ताराबाई ओंकार चव्हाण (वय ६५) यांच्यावर हल्ला केला. त्यांना तलवार रोखत अंगावरील चांदीचे कडे (गोट) एक किलो वजनाचे तसेच अंगावरील सोन्याची पोत, कानातले असं अडीच तोळे सोने लांबविले. तसेच आरती समाधान चव्हाण यांचे अंगावरील अडीच तोळे सोनेसह ८५ हजार रुपये रोख असा चार ते पाच लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला.
दरोडेखोरांनी ओंकार चव्हाण (वय ६८) यांना दोन्ही पायावर मोठ्या प्रमाणावर तसेच ताराबाई चव्हाण यांच्या कानास व हातावर मारून मोठी दुखापत केली. समाधान चव्हाण यास देखील जबर मारहाण दरोडेखोरांनी केली.
पोलिस तपास
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीसांनी घटनास्थळ गाठले. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डिवायएसपी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, एपीआय चंद्रसेन पालकर, फौजदार डोमाळे, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, कजगाव पोलीस चौकीचे नरेंद्र विसपुते यांचेसह भडगाव पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते. तपास एपीआय चंद्रसेन पालकर करीत आहेत.
दरोडेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न
पोलिसांनी घटनास्थळी धाडसी कर्मचाऱ्यांनी तपास
केला. दरोडेखोरांनी सोडलेल्या वस्तूंचा शोध घेतला. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरोडेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
घटनेने खळबळ
कजगावमध्ये सशस्त्र दरोडा झाल्याची घटना समजताच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी पोलिसांना मदतीसाठी फोन केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.