90 हजाराची स्विकारली होती लाच ; शिक्षा सुनावल्यावर आरोपीला कोसळले रडू
जळगाव : तक्रारदाराच्या वडीलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अभिन्यासाला अंतीम मंजूरी देण्यासाठी 90 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी भडगाव नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी स्नेहल विसपुते (28) तसेच वॉलमन रविंद्र पाटील या दोघांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोघांना दोषी धरुन एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाचे न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर स्नेहल विसपुते यांना रडू कोसळले. तीन वर्षाची शिक्षा असल्याने न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.
सहा साक्षीदार तपासले
तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे असलेल्या शेती क्षेत्राच्या अभिन्यासास अंतीम मंजूरी देण्याच्या मोबदल्यात स्नेहल विसपुते यांनी 31 जानेवारी 2012 रोजी 90 हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. व्हॉल्वमन रवींद्र पाटील यांच्यामार्फत त्यांनी ही रक्कम स्विकारली होती .लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना याच दिवशी रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी स्नेहल विसपुते तसेच रवींद्र पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर खटल्याच्या चौकशी कामकाजाला 2015 पासून सुरूवात झाली. न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.
अशी आहे कलम निहाय शिक्षा
समोर आलेल्या पुराव्यावरून न्यायालयाने मुख्याधिकारी स्नेहल विसपुते तसेच रविंद्र पाटील यांना दोषी धरले. त्यानंतर शिक्षा सुनावली. भादंवि कलम 7 नुसार स्नेहल विसपुते यांना दोन वर्ष सश्रम कारावास व 20 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास तसेच कलम 13 (1) सह 13 (2) खाली तीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा व 20 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास. तर रविंद्र पाटील याला कलम 12 खाली एक वर्ष सक्तमजूरीची शिक्षा तर पाच हजार रूपये दंड , दंह न भरल्यास दोन महिने साधी कैद. सरकार पक्षातर्फे अॅड. भारती खडसे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी अनिल सपकाळे तसेच केसवॉच सुनिल शिरसाठ यांनी सहकार्य केले.