भडगाव पंचायत समितीतील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

0

सेवानिवृत्त कर्मचार्‍याकडून मागितली दोन हजार 500 रुपयांची लाच

भडगाव- पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याची पेन्शन विक्रीची रक्कम व गॅ्रज्युएटीची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी दोन हजार 500 रुपयांची लाच मागणार्‍या भडगाव पंचायत समितीतील पेन्शन लिपिक राजेंद्र सर्जेराव पवार (57, भडगाव) यांना शुक्रवारी सायंकाळी जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. या कारवाईने लाचखोर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सापळा रचून केली अटक
भडगाव तालुक्यातील गुढे येथील पशू वैद्यकीय दवाखान्यातील व्रणोपचार असलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍याची पेन्शन विक्रीची रक्कम व गॅ्रज्युएटीची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी आरोपी पवार यांनी लाचेची मागणी केली होती तर तक्रारदाराने या संदर्भात 28 ऑगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने आरोपीस 31 रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.