भडगाव येथील देशमुख महाविद्यालयात भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन

0

भडगाव । येथील रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी उद्घाटन म्हणून कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे उपस्थित होते. ते यावेळी बोलताना म्हणाले की, आजची पिढी मूल्ये हरवत चालली आहे,असे आपण नेहमी म्हणतो. परंतु असे नसून आजचा युवक नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करताना दिसतो आहे. या पिढीत मूल्ये रुजविण्याची जबाबदारी जशी पालक, शिक्षक यांची आहे, त्याचप्रमाणे ती साहित्यिकांचीसुद्धा आहे. मुलांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी झाले, अशी ओरडसुद्धा आपण करतो. परंतु तेही तितकेसे खरे नाही. आज मुले विविध समाजमाध्यमांमधून व्यक्त होताना दिसतात. त्यामुळे या पिढीवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. असे प्रतिपादन कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले.

जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम वेळेत द्या
महाविद्यालयीन काळ म्हणजे जीवनाला नवनवीन धुमारे फुटण्याचा काळ असतो. तो काळ आपण रसरसून जगलो पाहिजे. जीवनाची दिशा याच काळात ठरवता येते. समाजाकडे उघड्या डोळ्यांनी बघायला महाविद्यालयच आपल्याला शिकवत असते. दीपप्रज्वलन करून मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक विनय जकातदार हे होते. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, मैत्रीचे नाते हे जगातल्या सर्व नात्यांमध्ये वेगळे आणि महत्त्वाचे असते. आपल्याला मन मोकळे करायला कुणी मित्र वा मैत्रिण असणे गरजेचे आहे. सळसळता उत्साह, जोश आणि काही करून दाखविण्याची उर्मी हे तारूण्याचे वैशिष्ट्य आहे. जीवनाचा मनमुराद आनंद याच वयात लुटता येतो. त्याचप्रमाणे जीवनाला योग्य दिशासुद्धा याच वयात मिळते.

यांनी घेतले परीश्रम
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रा.पी.के.तायडे, प्रा.एन.के.कुलकर्णी व प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड उपस्थित होते. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दिनेश तांदळे व इतिहास विभागप्रमुख डॉ. चित्रा पाटील यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. पी.डी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.अतुल देशमुख यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. क्रांती सोनवणे यांनी करून दिला.