भडगाव शहरातील दोन बालकांना डेंग्यूची लागण

0

स्वच्छतेबाबत शहरासह परिसराच्या नागरिकांची तक्रार

भडगाव । शहरातील कमलनगर यशवंतनगर भागातील दोन बालकांना डेंग्यूची लागण झाली. दोघा बालकांवर चाळीसगावात उपचार सुरू आहेत. पालिकेने स्वच्छता मोहीम व्यापक स्वरुपात राबवावी, असा सूर शहरवासियांतून उमटत आहे. यशवंतनगर भागातील रिजवान शेख याला तीन दिवसांपूर्वी, तर कमलनगरातील शिक्षक प्रवीण रंगराव पाटील यांचा मुलगा आयुष प्रवीण पाटील (वय-१०) याला दोन दिवसांपूर्वी डेंग्यूची प्राथमिक स्वरुपात लागण झाली आहे. या बालकाचा ताप उतरत नव्हता.

गटारींवर किटकनाशक फवारणीची मागणी
यासंदर्भात भडगावातील खासगी दवाखान्यात तपासणी केली असता त्यास डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यालाही चाळीसगाव येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. पालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असली तरी यात पाहिजे, त्या प्रमाणे स्वच्छता होत नाही. यशवंतनगर कमलनगरसह कॉलनी भागात स्वच्छता आणि गटारींवर किटकनाशक फवारणी झालेली नाही. याबाबत पालिकेचे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेने या भागात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, गटारींवर किटकनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. कॉलनी भागातून करवसुली होत असूनही त्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत, अशी शहरासह परिसराच्या नागरिकांची तक्रार आहे.