भडगाव । स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपुर्ण देश हगणदारीमुक्त करण्याचा ध्येय शासनाने ठरविले असून हगणदारीमुक्तीसाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. उद्दिष्टपुर्तीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कार्य करीत आहे. दरम्यान भडगाव शहराची केंद्रीय समिती मार्फत तपासणी करण्यात आली. समितीने भडगाव शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषीत केले आहे. समितीने 2 जून रोजी तपासणी केली होती. 4 जून रोजी तपासणीचा अहवाल नगरपरिषदेस प्राप्त झाला. अहवालात शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आले आहे. नगरपरिषदेने 27 एप्रिल रोजी शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पास करुन प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार ही तपासणी करण्यात आली.
राज्यस्तरीय समितीची शिफारस
नगरपरिषदेने शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठरावाचा प्रस्ताव जिल्हास्तरीय प्राथमिक तपासणीसाठी पाठविला होता. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर राज्यस्तरीय समितीकडून शहराची पाहणी करण्यात आली. त्यानुसार राज्यस्तरीय समितीने शहर हगणदारीमुक्त करण्याची शिफारस केली होती. शहर हगणदारीमुक्त झाल्याने समासधान व्यक्त करण्यात येत आहे.
पथकात यांचा सहभाग
2 रोजी दिल्लीचे केंद्रीय समितीचे पथक शहरात दाखल झाले होते. या पथकाचे प्रमुख एस.बीपीन, मानी होते. त्यांनी संपुर्ण दिवसभर शहरातील पेठ, टोणगांव, यशवंत नगर, गिरणा नदी पात्र भागातील तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1, लाडकुबाई माध्यमिक विद्यालयास भेट देऊन पाहणी केली होती. समितीत सहभागी असलेल्यांनी नगरपरिषद कर्मचार्यांना अभियानाबाबत मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
हगणदारीमुक्तीसाठी शासनाने कंबर कसली आहे. भडगाव शहर हगणदारीमुक्त झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नगरपरिषदेचे सत्कार करण्यात येणार असून शहरास एक कोटी रुपयाचे बक्षीस अनुदान स्वरुपात विकास कामांसाठी मिळणार आहे. नगराध्यक्ष शामकांत भोसले, नगरसेवक सुभाष पाटील, नगरसेविका योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, सुवर्णा पाटील, मुख्याधिकारी बबन तडवी यांची तपासणी करतांना उपस्थिती होती.