भयमुक्त व निरोगी समाजनिर्मितीसाठी सकारात्मकत आवश्यक

0

जळगाव: कोरोना या महामारीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेले आहे. जनमानसात या महामारीविषयी मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीत जनसामान्यांच्या मनातील भिती दूर करून भयमुक्त व निरोगी समाजनिर्मितीसाठी माध्यमांनी सकारात्मक बातम्या जनमानसांपर्यंत पोहोचवाव्या असेे मत ‘कोविड- 19 : सकारात्मक मिडीया आणि समाज’ या विषयावर आयोजीत राष्ट्रीय वेबिनारमध्ये माध्यमकर्मींनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, माखनलाल चर्तुवेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्वविद्यालय भोपाळ आणि मुल्यांनुगत मिडीया अभिक्रम समिती, इंदौर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड- 19 : सकारात्मक मिडीया आणि समाज’ या विषयावर दि.5 जुलै 2020 रोजी एकदिवशीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देशभरातील प्रख्यात पत्रकार, संपादक आणि माध्यम क्षेत्रातील अभ्यासकांनी मार्गदर्शन केले. वेबिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र. कुलगुरू प्रा. पी.पी. माहूलीकर, प्र. कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार यांचे शुभेच्छापर संदेशाचे प्रसारण करून करण्यात आले. तद्नंतर रायपूरचे युगरत्न यांनी स्वरचित स्वागतपर गीत सादर केले.
राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन दोन सत्रात करण्यात आले होते. पहिल्या सत्रात प्रविण दुबे (सिनियर एडिटर, नेटवर्क 18, भोपाळ), प्रकाश दुबे (समूह संपादक, दैनिक भास्कर, नागपूर), किर्ती राणा (वरिष्ठ पत्रकार ,दैनिक प्रजातंत्र, भोपाळ), प्रियंका कौशल (स्थानिक संपादक, भास्कर न्यूज, छत्तीसगड), डॉ. संदिप पुरोहित ( स्थानिक संपादक, राजस्थान पत्रिका, उदयपूर) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वरिष्ठ पत्रकार प्रविण दुबे यांनी कोरोनाविषयी प्रसारमाध्यमात दिसून येणा-या अतिरंजित बातम्या आणि त्यांचा समाजावर पडणारा प्रभाव, याविषयी मार्गदर्शन केले. टीआरपी मिळविण्याच्या स्पर्धेत माध्यमे अतिरंजीततेकडे वळत असल्याने समाजात भितीचे वातावरण निर्माण होते. सकारात्मक बातम्यांमुळे ही भिती काही प्रमाणात कमी करता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भोपाळचे वरिष्ठ पत्रकार किर्ती राणा यांनी सांगितले की, कोरोना सारखी महामारी यापूर्वी आलेली नाही. त्यामुळे अशा महामारीप्रसंगी वार्तांकन करण्याचा अनुभव पत्रकारांना नवीन आहे. मात्र अशाही परिस्थितीत जनमानसात या महामारीविषयी भिती न पसरविता त्यासोबत सक्षमपणे लढण्याची जिद्द जनमानसात निर्माण करण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागपूरचे वरिष्ठ संपादक प्रकाश दुबे यांनी, पत्रकार हा कोरोना काळातील सजग प्रहरी असल्याचे मत व्यक्त केले. सकारात्मक समाजनिर्मितीत माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून पत्रकारांनी या दृष्टीकोनातून कार्य करावे असे सांगितले. वार्तांकन करतांना काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. तरीदेखील पत्रकारिता थांबलेली नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. छत्तीसगड येथील भास्कर न्युजच्या प्रियंका कौशल यांनी वेब पत्रकारिता याविषयावर आपले मत व्यक्त केले. कोरोना काळात वेब पत्रकारिता अधिक प्रभावी ठरल्याचेही त्यांनी सांगितले. उदयपूरचे वरिष्ठ पत्रकार डॉ.संदिप पुरोहित यांनी कोरोना काळात पत्रकारांसमोर रोज नवीन आव्हाने उभी राहत असून त्यांचा समर्थपणे सामना पत्रकार आणि त्याचे कुटुंबिय करीत असल्याचे मत व्यक्त केले.

दुपारच्या सत्रात प्रा. कमल दिक्षित (राष्ट्रीय संयोजक, मुल्यानुगत मिडीया अभिक्रम समिती, इंदौर), प्रा. डॉ. संजय द्विवेदी ( कुलगुरू, माखनलाल चर्तुवेदी, राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्वविद्यालय, भोपाळ), प्रा. डॉ. संजीव भानावत (माजी विभाग प्रमुख जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, राजस्थान विद्यापीठ, जयपूर), डॉ.रिना (राष्ट्रीय सचिव, मूल्यानूगत मिडीया अभिक्रम समिती, इंदौर) यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा.कमल दिक्षित यांनी सांगितले की, माध्यमांनी कोरोना काळात प्रसारित केलेल्या बातम्यांविषयी स्वमूल्यांकन करणे गरजेचे आहे. या काळातील बातम्यांमुळे माध्यमांनी लोकांमधील भिती वाढविली की कमी केली, कोरोनाविषयी बातम्यांचा काय परिणाम झाला, याविषयी आत्मचिंतन करून अधिक सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. कुलगुरु प्रा.संजय द्विवेदी यांनी माध्यमांनी लोककल्याणकारी आणि लोकमंगल बातम्यांना अधिक स्थान द्यावे. भारतीय मूल्यांच्या विकासासाठी माध्यमांनी अधिक योगदान द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले. जयपूर येथील प्रा.संजीव भानावत यांनी, कोरोना काळातील माध्यमातील आर्थिक संकट याविषयी विवेचन केले. या आर्थिक संकटात अनेक पत्रकारांची नोकरी गेली. मात्र तरीही माध्यमांनी जनजागृतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. इंदौरच्या बी के डॉ.रिना यांनी सकारात्मक समाजनिर्मितीत माध्यमांच्या भूमिकेवर सविस्तर मार्गदर्शन केले.

या राष्ट्रीय वेबिनारसाठी देशभरातून 1600 जणांनी सहभाग नोंदविला होता. यात जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयाव्यतिरिक्त इतरही विषयाचे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि पत्रकार सहभागी झाले होते. वेबिनारच्या प्रारंभी आयोजनाबाबतची भूमिका माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्वविद्यालय, भोपाळचे डीन अॅकेडेमीक प्रा.डॉ.पवित्र श्रीवास्तव यांनी सविस्तर विषद केली. वेबिनारचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्वविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ.राखी तिवारी यांनी केले. आभारप्रदर्शन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर यांनी केले.

वेबिनारच्या यशस्वितेसाठी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक डॉ.अनिल चिकाटे, जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे डॉ. विनोद निताळे, डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, भोपाळ येथील माखनलाल चर्तुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संचार विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो.अविनाश वाजपेयी, प्रा. डॉ. अनुराग सीठा, डॉ. गजेंद्र सिंह अवास्या तसेच मुल्यानुगत मिडिया अभिक्रम समितीचे पूर्वाध्यक्ष संदिप कुलश्रेष्ठ (भोपाळ), महाराष्ट्र संयोजक राजेश राजोरे (खामगाव), कोषाध्यक्ष प्रभाकर कोहेकर, नारायण जोशी (इंदौर), दिलीप बोरसे (नाशिक), सोमनाथ म्हस्के (पुणे), तरूण सेन, सोहन दिक्षित, मनोज पटेल (भोपाळ), बी.के.नंदिनी (अहमदाबाद) आदिनी सहकार्य केले.