पुणे । जगात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार व फसवाफसवी वाढत आहे. अशा वेळेस समाजाला पुढे नेण्याचे कार्य काही लोक करीत आहेत. अशा लोकांना माध्यमांनी समाजासमोर आणावे, असे आव्हान लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अशोक कुकडे यांनी केले.एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे,विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार 2017 च्या प्रदान समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुणे येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रा. डॉ. मंगेश कराड, रमेशअप्पा कराड, तुळशीराम कराड याप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड नवरत्न परिचय पुस्तकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. शंकरराव खोत, बेबी गायकवाड, डॉ. अशोक बेलखोडे, सुदाम भोंडवे, प्रणव खुळे, रेखा भिसे, रोहिणी नायडू, प्रदीप नणंदकर व ह. भ. प. जयवंत महाराज बोधले यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
…तर भारत विश्वगुरू म्हणून उदयास येईल
समाजसाठी झटणार्या आपल्यासारख्या व्यक्तींचा गौरव करताना संस्थेचाही सन्मान वाढत आहे. 21 वे शतक भारतीयांचे असून स्वामी विवेकानंदाचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल, तर अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांतता नांदेल. आपल्यासारख्या लोकांच्या कार्यातून भारत हा 21 व्या शतकात विश्वगुरू म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चार विद्यापिठांची निर्मिती
प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. समाजात नवयुवक तयार करून राष्ट्र निर्माण करण्याची महत्वाची भूमिका एमआयटी शिक्षण संस्था पार पाडीत आहे. संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच चांगला युवक तयार करण्याचे कार्य होत आहे. त्याचेच फलस्वरूप चार विद्यापीठांची निर्मिती झाली आहे. डॉ. सरिता मंत्री यांनी प्रास्ताविक केले.
नवरत्नांचा सत्कार
एमआयटीच्या माध्यमातून नवरत्नांचा सत्कार केला जातो. त्यामुळे या समाजाला योग्य दिशा मिळून चांगल्या कार्याची प्रेरणा मिळेल. माध्यमांनी अशा रत्नांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच चांगल्या समाजाची निर्मिती होण्यास वेळ लागणार नाही. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अध्यत्मिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजाची धारणा तयार होते. त्यामुळे प्रत्येक घटक समाज घडविण्यासाठी महत्वाचा आहे, असे डॉ. कुकडे यांनी सांगितले.