वासिंद । भाव, राग, ताल यांचा अपूर्व संगम असलेल्या भरतनाट्यम या प्राचीन शास्त्रीय नृत्य प्रकाराचा अनोखा अविष्कार पाहून वासिंद पंचक्रोशीतील रसिकांची रविवारची सायंकाळ विस्मरणीय ठरली. निमित्त होते जिंदाल विद्यामंदिरच्या पाच विद्यार्थिनींच्या आरंगेत्रम सोहळ्याचे. तीर्था पिल्लाई, धनश्री घोडविंदे, आर्या कुमावत, एकता बढिये, ओजस्वीनी पोद्दार या वासिंदमधील जिंदाल शाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्यगुरू स्वप्नील धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षे नृत्य साधन व अभ्यास करून भरतनाट्यममध्ये प्रावीण्य संपादन केले आहे. स्वप्नांजली नृत्यालय व जिंदाल विद्यालयाने आयोजित केलेल्या या सोहळ्यात पाचही नर्तिकांच्या मुद्रा, भाव, पदलालित्य, सादरीकरणाचे कौशल्य पाहून प्रेक्षक थक्क झाले.
पुष्पांजली गणेश कीर्तन,आलारीपू, सरस्वती स्तुती, जतीश्रवण, शीवपूजन, कृष्णकीर्तन, थील्लाना, तरंगम् आणि मंगलम् आदी नृत्य सादर करण्यात आली. मेडलीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. तेव्हा रसिक भावविभोर झाले होते. डॉ. सोमिया या विख्यात शास्त्रीय गायिकेने हंसध्वनी, रेवती, वृंदावनीसारंग, मोहनकल्याणी, आदी रागस्वरांवर गायन साथ केली. तालस्वरांसाठी नृत्यगुरू स्वप्नील धोत्रे (नट्वंगम) व्यंकटेश(मृदंगम),कुमार कृष्णन (बासरी) बालाजी सुब्रमण्यम (व्हायोलिन), मुकुंद कुमार(घटम),शिवानंद राव (मोर्शींग) अजय जोशी(तानपुरा) यांची साथ संगत ऐकताना हजारो रसिक मंत्रमुग्ध झाले.
विद्यार्थिंनीचे अभिनंदन
सुप्रसिद्ध निवेदिका दीप्ती भागवत यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला आमदार पांडुरंग बरोरा, जिंदाल समुहाचे अधिकारी राजेश जैन, जे. डी.जिंदाल, संजय गोयल, चिन्मय पालेकर, मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी सुनील यांनी दीपक प्रज्वलन करून प्रास्ताविक केले, तर पाचही विद्यार्थिनींच्या पालकांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. या प्रसंगी जिंदाल समुहाचे राजेश जैन यांनी सर्व विद्यार्थिनींच्या व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.