देहूरोड : येथील एका डेपोत भरती प्रक्रियेसाठी विविध राज्यांतून सुमारे 300 तरूण आले आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने आलेल्या तरुणांना शहरात निवारा मिळू शकेल, असे एकही ठिकाण उपलब्ध नाही. मात्र, येथील गुरुसिंग सभा गुरुद्वाराच्या तळमजल्यावर या सर्व तरुणांची राहण्या-खाण्याची सोय गुरुद्वारातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती. गुरुद्वाराने पुढे केलेल्या माणुसकीच्या हातामुळे भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तरुणांनी समाधान व्यक्त केले.
विविध राज्यातून आले तरूण
देहूरोड येथील एका लष्करी डेपोत काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीच्या जाहिराती देशभरातील वृत्तपत्रांमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा आदी राज्यातून मोठ्या संख्येने तरूण येथे नशीब आजमाविण्याठी आले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून तरुणांचा ओघ सुरू आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या तरुणांसाठी शहरात आसरा मिळू शकेल, असे एकही ठिकाण नव्हते. पावसामुळे किमान डोके लपवायली तरी जागा मिळावी, यासाठी तरुणांची धडपड सुरू होती.
गुरमितसिंग रत्तू यांचे औदार्य
भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तरुणांची निवार्याची सोय नसल्याने तारांबळ होत असल्याची बाब श्री गुरुसिंग सभा गुरुद्वाराचे विश्वस्त गुरमितसिंग रत्तू यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ या सर्व तरुणांना गुरुद्वारात निवारा उपलब्ध करून दिला. एवढेच नव्हे तर; येथील तरूण शीख बांधवांनी या तरुणांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थाही केली. गेल्या चार दिवसांपासून हे तरूण गुरुद्वाराच्या तळमजल्यावर बिनदिक्कत राहत आहेत. परराज्यातून आलेल्या अनेक तरुणांकडे खर्चासाठी मर्यादित पैसे आहेत. त्यामुळे हॉटेल किंवा लॉजमध्ये खोली घेऊन राहणे त्यांना शक्य नाही. मात्र, ऐनवेळी आम्हाला बाबूजी भेटले. त्यांनी आदराने आम्हाला येथे आणले. येथे राहण्याची व मोफत खाण्याची व्यवस्था केली. आम्ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, अशा भावना अनेक तरुणांनी व्यक्त केल्या.