लोणावळा । लोणावळा नगरपरिषदेमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले भरत हारपुडे यांचे नगरसेवक पद रद्द ठरविण्यात आले आहे. हारपुडे यांनी सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नुकतेच पारित केले.
डिसेंबर 2016 झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 10(अ) मधून हारपुडे निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या कुणबी या जात प्रमाणपत्रावर विरोधी उमेदवारांनी हरकत घेतली होती. त्यानंतर 19 जून 2017 रोजी हारपुडे यांचा जातीचा दाखला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविला. त्यावर हारपुडे यांनी उच्च न्यायालयात तसेच नंतर सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र न्यायालयानेही त्यांच्या विरोधात निकाल दिल्याने अखेर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जाहीर केले.