भरदिवसा पावणेतीन लाखांची रोकड लंपास

0
डांगे चौकातील घटना
पिंपरी-चिंचवड : खासगी कंपन्यांचे पैसे बँकेत भरण्यासाठी निघालेल्या एका कर्मचार्‍याला आडवून त्याच्याकडील पावणेतीन लाखाची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास डांगे चौक येथे घडली. दिलीप नारायण कांबळे (वय 42, रा. फाईव्ह नाईन चौक, येरवडा ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासगी कंपनीची रोकड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे रेडीयेंट कॅश मॅनेजमेन्ट या खासगी कंपनीत कॅश गोळा करण्याचे काम करतात. कांबळे मंगळवारी चिंचवड परिसरातून कॅश गोळा करून येत होते. ते डांगे चौक येथे आले असता त्यांच्याजवळ एक कार आली. कारमधील चोरटयांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकी थांबवण्यास भाग पाडले. कांबळे यांनी दुचाकी थांबवताच कारमधील दोघेजण खाली उतरून त्यांच्या पाठीवरील बॅग आणि खिशातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून घेतला. मोबाईल चोरून नेल्याने कांबळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.