शिरपूर। शहरातील गणेश कॉलनीतील राहणार्या नफीसाबी दिदार खाटीक यांची अज्ञात दरोडेखोरांनी हत्या केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. सोन्याचा नेकलेस दरोडेखोरांनी नेला असून बाजुला असलेले दुसरे कपाट सुध्दा तोडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मयताच्या अंगावरील दागिने तसेच सोडून ते निघुन गेल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. मारेकर्यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचा सेटपबॉक्स नेल्यामुळे नेमके ते कोण होते? समजू शकले नाही. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भरदुपारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मृतक महिलेचा लहान मुलगा अतिफ हा दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास घरी आला. तेव्हा ही घटना उघडकीस आली. दिदार उर्फ राजुशेट भिकारी खाटीक हे शहरातील गणेश कॉलनीत पाण्याच्या टाकीजवळील प्लॉट नंबर 1 मध्ये परिवारासह राहतात. त्यांचा बोंबील व अंडे विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या 8 मे 2016 रोजी झालेल्या दंगलीत त्यांच्या घरासमोरील गाडीच्या काचा फोडण्यात आल्यानंतर त्यांनी घरासह परिसरात 4 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. 16 रोजी दिदार खाटीक यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा अरबाज (20) व लहान आतिक (14) हे ही गावातील दुकानावर गेले होते. त्यामुळे त्यांची पत्नी नफीसाबी दिदार खाटीक (45) या शहरातील कुंभारटेक परिसरात डॉ.शकील यांच्याकडे लग्न कार्यक्रमाला गेल्या होत्या. बाथरुमचा दरवाजा उघडून पाहिले असता त्यावेळी नफिसाबी मयत स्थितीत दिसुन आल्या. तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतू डॉक्टरांनी मृत घोषित केले. मारेकर्यांनी महिलेला मारल्यानंतर घरात बसविलेला सीसीटीव्ही कॅमेराचा सेटअपबॉक्स (डीव्हीआर) काढुन नेला. जेणेकरुन मारेकरांनी घरात प्रवेश केल्यामुळे ते कॅमेर्यात कैद झाले असतील म्हणून चलाख मारेकर्यांनी तो काढुन नेल्यामुळे नेमके कुणी मारले ते समजू शकले नाही. घटनास्थळी श्वान पथक सुध्दा आणण्यात आले मात्र ते हाकेच्या अंतरापर्यंत गेल्यानंतर घुटमळले, त्यानंतर ते पुढे गेले नाही.