यावल : भरधाव अॅपेरीक्षा रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात तीन महिला जखमी झाल्या तर यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात भालोद-यावल रस्त्यावर घडला. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
भालोद शेतमजूर महिला पिळोदा येथील शेतशिवारात कामासाठी गेल्यानंतर दुपारी शेतीकाम आटोपून एका अॅपे रीक्षाद्वारे घराकडे परतत असताना अॅपे चालकाचा रस्त्याचा अंदाज न आल्याने ही रीक्षा रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये माधुरी मुरलीधर पिंगळे (45) आणि सुनीता दीपक भालेराव (40) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हात व पायांची हाडे मोडली गेली आहेत. दोन्ही महिला या यावल तालुक्यातील भालोद येथील रहिवासी आहेत तर तिसरी महिला नंदा विजय भालेराव यांना किरकोळ दुखापत झाली. जखमी महिलांवर प्रथम भालोद आरोग्य केंद्र व नंतर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार केले मात्र दोन गंभीर जखमी महिलांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले.