भरधाव अ‍ॅपे अनियंत्रीत होवून उलटली ः आंदलवाडीतील दोघे जागीच ठार

भुसावळ : लग्नाच्या बस्त्यासाठी निघालेल्या रावेर तालुक्यातील आंदलवाडीतील नातेवाईकांच्या अ‍ॅपे रीक्षाला फैजपूर-भुसावळ रस्त्यावरील भोरटेक फाट्याजवळ अपघात होवून त्यात दोघे ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात नवरदेवाचे वडील दिलीप दिनकर तायडे (50, आंदलवाडी) तसेच नवरदेवाची काकू ज्योत्सना गोकुळ तायडे (45, आंदलवाडी) हे ठार झाले तर अ‍ॅपेतील ज्योती बुधाकर तायडे, ललिता संतोष तायडे बुधाकर भास्कर तायडे यांच्यासह अन्य जखमी झाले. दरम्यान, आंदलवाडी येथे रविवारी रात्री दोघा मयतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नियंत्रण सुटल्याने रीक्षा उलटली
सूत्रांच्या माहितीनुसार, आंदलवाडी, ता.रावेर येथील शुभम दिलीप तायडे याच्या लग्न बस्त्यासाठी नवरदेवाकडील रविवारी भुसावळ येथे अ‍ॅपे (एम.एच.19- बी.यु.5156) ने निघाली होती मात्र भोरटेक फाट्याजवळ खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अ‍ॅपे उलटली व या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. अपघातात नवरदेवाचे वडील दिलीप दिनकर तायडे (50) तसेच नवरदेवाची काकू ज्योत्सना गोकुळ तायडे (45) यांचा मृत्यू ओढवला तर ज्योती बुधाकर तायडे, ललिता संतोष तायडे बुधाकर भास्कर तायडे हे जखमी झाले.

पोलिस प्रशासनाची धाव
अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी, पाडळसे पोलिस पाटील सुरेश खैरनार, पाडळसे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, भोरटेक येथील सामाजिक कार्यकर्ते स्वामी कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपस्थितांच्या सहाय्याने उपचारार्थ भुसावळात हलवले.