नशिराबादनजीक अपघात; अज्ञात वाहन चालक पसार
भुसावळ– शहरातील जामनेर रोडवरील दुर्गा कॉलनीत रहिवासी विनोदकुमार टिकमदास टेकवानी (52) यांच्या दुचाकीला अज्ञात आयशर वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जयेश टेकवानी जखमी झाला. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मयत टेकवानी हे जळगावच्या कृष्णालॅम या प्लायवूड शोरूममध्ये कामास आहेत तर त्यांच्या मुलाचे जळगाव येथे मोबाईल दुकाने आहे. दोघे पिता-पूत्र सोमवारी रात्री दुचाकी (एम.एच.19 सी.एच.7066) ने भुसावळकडे येत असताना आयशरने दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना अचानक ब्रेक मारल्याने चारचाकीतील लोखंडी सळई बाहेर येऊन ती विनोदकुमार टेकवानी यांच्या छातीत शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला तर जयेश जखमी झाला असून त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत टेकवानी यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परीवार आहे. मंगळवारी रात्री शोकाकुल वातावरणात सिंधी समाज स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.