भरधाव आयशरच्या धडकेत रेमंडचा कर्मचारी ठार

0

अन्य एक जखमी ; गोदावरी रुग्णालयाजवळ अपघात ; अपघातानंतर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा

भुसावळ- भरधाव आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने जळगाव खुर्द येथील रहिवासी व जळगावच्या रेमंड कंपनीत कर्मचारी म्हणून कामाला असलेला दुचाकीस्वार जागीर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. सुमारे पाच ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली तर नशिराबाद पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी धाव घेतल्यानंतर सुमारे तासाभरानंतर वाहतूक सुरळीत झाली.

भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला उडवले
भुसावळकडून जळगावकडे जाणारा आशयर ट्रक (एम.एच.04 डी.एस.5306) ने जळगावकडून भुसावळकडे येणारी यामाहा दुचाकी (एम.एच.19 के.3588) ला धडक दिल्याने दुचाकीस्वार तुषार भागवत पाटील (30, जळगाव खुर्द, जि.जळगाव) हा डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत पाठीमागे बसलेला सहकारी दिलीप गोपाळ पाटील (30, जळगाव खुर्द, जि.जळगाव) हा जखमी झाला. गोदावरी रुग्णालयाजवळील 220/25 केव्ही उपकेंद्रासमोरच हा अपघात झाला. दरम्यान, अपघातातील दोघा जखमींना सुरुवातीला गोदावरील हलवण्यात आले तर डॉक्टरांनी तुषार पाटील यांना मयत घोषित केले तर दिलीप पाटील यांच्या डोक्याला व हाताला मुका मारल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अपघातानंतर पाच किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने रस्ता अरूंद झाला असून आधीच या महामार्गावर वाहनांची वर्दळ असताना नित्याचे अपघात वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्यानंतर आयशर चालकाने घटनास्थळावरून धुम ठोकली तर रस्त्यावरील वाहनामुळे जळगाव व भुसावळ बाजूला सुमारे पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक हिवरकर, हवालदार राजू साळुंखे, हसमत अली सैय्यद, युनूस शेख तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तर अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.