उरण । उरण एसटी बस आगारातून शिर्डीकडे जाणार्या भरधाव वेगातील एसटी बसने जेएनपीटी बंदराकडे येणार्या मालवाहू टेलरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी प्रवाशांच्या डोक्याला, तोंडाला, पायांना, हातांना, कंबरेला मार लागल्याने बसमधील सुमारे 25 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात गव्हाण फाटा येथे झाला असून बसमधील जखमी प्रवाशांना पनवेल, वाशी, उरण व जासई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अवेळी आलेल्या पावसामुळे बसचालकाचा ताब सुटला
उरण एसटी बस आगारातून सोमवारी शिर्डीकडे जाणारी बस नेहमीप्रमाणे सकाळी ठिक 9 वाजून 5 मिनिटांनी प्रवाशांना घेऊन निघाली होती. यावेळी जेएनपीटी, गव्हाणफाटा परिसरात अवेळी आलेल्या पावसाने हजेरी लावली असल्याने पनवेलच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्या एसटीचालकाचा आपल्या बसवरील ताबा सुटल्याने त्या एसटी बसचालकांनी जेएनपीटी बंदराच्या दिशेने येणार्या मालवाहक ट्रेलरला समोरून जोरात धडक दिली.