भरधाव एसयूव्ही नेली थेट घराच्या छतावर!

0

सेंट लुईस | शहरातील रस्त्यावरून सुसाट एसयूव्ही पिटाळणाऱ्या एका बहाद्दराने अचानक आलेल्या वळणावर नियंत्रण सुटल्याने एस्क्सिलेटर आणि गिअरची अशी काही अफलातून कमाल केली की जीप वळण न घेताच हेलिकॉप्टरसारखी उडून थेट एका घराच्या छतावरच लँड झाली. हे अजस्त्र चारचाकी धूड इतक्या वेगाने छतावर आदळताच लाकडी टुमदार घराचे छत तर कोसळून पडलेच; पण दोन भिंतींचाही चक्काचूर झाला.

सुदैवाने त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. घराचा 66 वर्षीय मालक जिममध्ये गेला होता. पोलिसांना शेजाऱ्यांनी कॉल केला. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी 3 तासांच्या मेहनतीने एसयूव्ही छतावरून खाली उतरविली. तत्पूर्वी दरवाजा तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले होते. तो बेशुद्धावस्थेतच होता. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरमालक जिमहून परतल्यानंतर त्याने लवकर व्यायामाला जाण्याची सुबुद्धी देऊन जीव वाचविल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. मात्र, घराचा एकूणच बोजवारा उडाल्याचे पाहून त्याने ऊर बडवून घेतला.