जळगाव । जळगावकडून मुंबईकडे जात असलेल्या भरधाव कारने समोरून येणार्या मोटारसायकल व प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे तरूण गंभीर जखमी झाले तर कार चालक आणि रिक्षातील दोघी महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. संतप्त जमावाने तरूणांस चांगलेच बदडले. याबाबत जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखलबाबत प्रक्रिरा सुरु होती.
कार खंडव्याहून जात होती मुंबईकडे
कार चालक श्याम याने काल रात्री ठाणेहून काही प्रवाशी भरून खंडावाला गेला होता. खंडव्याला प्रवाशी उतरवून पुन्हा तो मुंबईकडे जात होता. जळगाव शहरात आल्यानंतर त्यांने गोदावरी इंजिनिअरींग महाविद्यालयाजवळ इंडीका थांबवून उसाचा रस पिला. त्याचवेळी सरवंतीच्या ठिकाणी मालेगाव कडे जाण्यासाठी एक अनोळखी व्यक्ती आणि सोबत दोन महिला व लहान मुले मालेगावसाठी थांबले होते. यावेळी कार चालकांने मुंबईकडे जाण्यासाठीचा रस्ता विचारल्यानंतर अनोळखी व्यक्तीने ‘मालेगाव घेवून जाणार का?’ असे विचारल्यानंतर कार चालकाने सर्वांना इंडिका गाडीत बसविले. यावेळी अनोळखी व्यक्ती मी गाडीचालक आहे असे सांगून कार चालविण्याचे लायसन्स दाखविल्यानंतर ‘गाडी मी चालवतो, तुम्ही आराम करा’ असे सांगितल्यावर कारचालक कारच्या डाव्या बाजूला बसला आणि अनोळखी व्यक्त कार चालवत होता, अशी माहिती खूद कार चालक श्याम अस्त्रेसरोज याने जनशक्तिशी बोलतांना सांगितले.
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, रिक्षा चालक रविंद्र काशिनाथ बारी (वय-52, हरिविठ्ठल नगर) हे रिक्षा क्र.(एमएच 19 जे 8155) ने पाळधीकडून जळगावात येत असतांना बांभोरी येथून अनिता सोमेश पाटील (वय-35, अयोध्या नगर) व इंदूबाई भागवत पाटील (वय-53, निपाणे ता.एरंडोल) या मायलेकी रिक्षात शहरात जाण्यासाठी बसल्या. शिवकॉलनीचा स्टॉप क्रॉस केल्यानंतर पुढे खोटे नगर स्टापजवळ रिक्षाच्या मागे लाल कलरची पल्सर मोटारसायकल क्रमांक (एमएच 19 बीडी 8772) ने जात असतांना पुढे चालणार्या रिक्षाला समोरून येणार्या भरधाव इंडीका क्रमांक (एमएच 02 ईएच 1618)ने जोरदार धडक दिल्याने रिक्षात बसलेल्या दोन्ही महिला अनिता सोमेश पाटील व इंदूबाई भागवत पाटील ह्या किरकोळ जखमी झाल्या. तर रिक्षाच्या मागे येणार्या मोटारसायकलवरील शुभम दिपक जाधव (वय-18) व मनोज सुपडू पाटील (वय-20) दोन्हा रा. कुसुंबा रस्त्यावर पडल्याने दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. तर कार चालक श्याम राम अस्त्रेसरोज (वय-31, रा. मुंबई) ास किरकोळ जखमी झाला असून त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रिक्षा चालकाची तक्रार
समोरून येणार्या भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाच्या पुढचा पय्या निखरून पडून रिक्षाचे मोठे नुकसान झाले. तर दुचाकी पल्सच्या पुढच्या चाक मॅकव्हिल असल्याने चाकाची रिंगचा देखील तुकडे पडले होते. तर कार चालवितांना अनोळखी चालकाचा ताबा सुटल्यानंतर धडक दिल्यानंतर कार थेट बाजूला असलेला मोठ्या गटारीवर येवून धडकली. या अपघातात तिघा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रिक्षा चालक रविंद्र काशीनाथ बारी यांनी कार चालकाच्या विरोधात तक्रार दिली असून रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम जिल्हापेठ पोलीसात सुरू होते.