भुसावळ : भुसावळ एस.टी.आगारातील कर्मचारी पत्नीच्या भेटीसाठी दोघा चिमुकल्या मुलांना घेवून दुचाकीने निघाले असता भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात अडीच वर्षीय चिमुकला जागीच ठार झाला तर पिता-पूत्र जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रोझोदा गावाजवळ झाला.या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या अपघाताने न्हावी गावावर शोककळा पसरली.
भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक
न्हावी, ता.यावल येथील पाटील वाड्यातील रहिवासी तथा भुसावळ येथील एस.टी.आगारातील वर्कशाप कर्मचारी खेमचंद्र मधुकर पाटील (42) यांच्या पत्नीवर शस्त्रक्रिया झाल्याने त्या आपल्या माहेरी रोझोदा, ता.रावेर येथे गेल्या होत्या. गुरूवारी सायंकाळी खेमचंद्र पाटील हे न्हावी येथून मुले सोहम खेमचंद्र पाटील (8) व ओम खेमचंद्र पाटील (2.5) या दोघांना घेवून दुचाकीव्दारे पत्नीची भेट घेण्यासाठी निघाले. रोझोदा, ता.रावेर गावाबाहेर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीस समोरून येणार्या एका चारचाकीने जबर धडक दिली. या अपघातात अडीच वर्षीय ओम हा जागीच ठार झाला तर पाटील यांच्या डोक्यास जबर दुखापत झाली तसेच मोठा मुलगा सोहम याच्या कंबरेस व पायास जबर दुखापत झाली. दोघा जखमींना उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. मयत ओम याच्यावर शोकाकुल वातावरणात न्हावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे न्हावी गावावर शोककळा पसरली.