नांदुरा-वडनेर रस्त्यावर अपघात ; नियंत्रण सुटल्याने चारचाकी पुलाखाली कोसळली
भुसावळ:- भरधाव चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात जळगावातील दोघा महिलांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नांदुरा-वडनेर रस्त्यावर रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथील मित्र वारल्याने अंत्ययात्रेसाठी जळगावातील कोळी व नाले कुटुंब चारचाकीने रविवारी सकाळी गेले होते. अंत्ययात्रेनंतर परतीच्या प्रवासात चारचाकी इंडिका व्हिस्टा (एम.एच.19 बीजे 5614) ही जळगावकडे निघाली असताना नांदुर्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदुरा-वडनेर रस्त्यावरील पुलाखाली कोसळली.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन कठडे नसलेल्या पुलाखाली कोसळल्याने प्रांता अर्जुन कोळी (55, वाल्मीक नगर, जळगाव) व अलका वसंत नाले (55, नटराज टॉकीजवळ, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक अर्जुन कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खामगाव येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात वसंत नाले हे बचावले असलेतरी त्यांना अपघाताचा शॉक बसल्याने ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.