नशिराबाद गावाजवळील वळणावर अपघात : दोन्ही वाहनातील पाच जण जखमी
भुसावळ (गणेश वाघ)- भरधाव चारचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या भीषण अपघातात जळगाव येथील चौघांचा जागीच दुदैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद गावाजवळील वळणावर गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनातील पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. अपघात एव्हढा भीषण होता की एका कारचा अक्षरशा चुराडा झाला तर अपघातानंतर नशिराबाद पोलिसांनी धाव घेत जखमींना तातडीने जळगाव येथे हलवले. या अपघातात एका कारमधील जळगाव येथील अग्रवाल कुटुंबातील तिघे तर दुसर्या वाहनातील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मयत झालेले चारही तरुण जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील आहेत. गुरुवारी पहाटे अपघाताचे वृत्त नातेवाईकांना कळताच त्यांनी मुलांचे मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.
समोरा-समोर धडकल्या भरधाव चारचाकी
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावाच्या वळणावरील काझी पेट्रोल पंपाजवळ जळगावकडून भुसावळकडे जाणारी आयटेन कार (एम.एच.19 बी.यु.8710) व भुसावळकडून जळगावकडे जाणारी क्रेटा कार (एम.एच.19 सी.यु.6633) मध्ये समोरा-समोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की आयटेन कारचा पुढील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात आयटेन कारमधील जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील रहिवासी असलेल्या समुद्रगुप्त उर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (20, रा.गेंदालाल मिल, जळगाव), दीपक अशोक चव्हाण (22, गेंदालाल मिल, जळगाव), सुबोध मिलिंद नरवाडे (18, गेंदालाल मिल, जळगाव), रोहित जमदाडे (18, गेंदालाल मिल, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे मित्र शुभम विजय इंधवे (20, गेंदालाल मिल, जळगाव) व सचिन अशोक तायडे (22, गेंदालाल मिल, जळगाव) हे जखमी झाले तसेच दुसर्या क्रेटा वाहनातील जळगावातील रहिवासी असलेल्या अग्रवाल कुटुंबातील तीन गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जळगावातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यांची नावे उशिरापर्यंत कळू शकली नाहीत.
पोलिसांनी घेतली धाव
अपघाताचे वृत्त कळताच नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबडे यांच्यासह उपनिरीक्षक अशोक खरात, चेतन पाटील, हसमत अली, संजय जाधव, किशोर इंगळे आदींनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना हलवले. विशेष म्हणजे आयटेन वाहनाचा चालक बंटी सुरवाडे हा क्रेटा वाहनाच्या धडकेनंतर आयटेन वाहनात अडकल्यानंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास क्रेन आणल्यानंतर अपघातग्रस्त वाहनातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. या अपघातानंतर दोन्ही बाजूकडील वाहतूूक सुमारे अर्धा तासांपर्यंत ठप्प झाली होती.
नातेवाईकांनी फोडला हंबरडा
मयत चौघांचे मृतदेह जळगावच्या सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडल्याने शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. या अपघात प्रकरणी सीएमओ डॉ.सुशांत सुपे यांच्या खबरीनुसार नशिराबाद पोलिसात गुरुवारी पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या क्रेटा वाहनातील जखमी अग्रवाल परीवाराला जळगावातील आर्कीड व भंगाळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.