भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : भुसावळातील दाम्पत्य जखमी

भुसावळ : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वांजोळा रोडजवळ रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रकच्या धडकेने दाम्पत्य जखमी
सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक गजनन गोगीया व रजनी अशोक गोगीया (दोन्ही रा.हनुमान नगर, जुना किराणाजवळ, भुसावळ) हे दुचाकी (एम.एच.19 ए.यु.4986) ने महामार्गावरून भुसावळकडे येत असताना समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक (जी.जे.25 टी.8698) ने धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी पहलाज मनोहरलाल गोगीया (43, हनुमान नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार ट्रक चालक नवगन हरदास जडेजा (विजारी स्ट्रीट, खडच पोरबंद, गुजराथ) याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक शशीकांत तायडे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली असून ही वाहने पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत.