भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी ठार ; यावल शहरातील घटना

0

यावल- भुसावळकडून यावल शहरात येत असलेल्या भरधाव ट्रकने एका पादचारीस जबर दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. हा अपघात येथील भुसावल टी पॉइंटवर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला. दिलीप बाबुराव बिरारी (50, सुदर्शन चौक जवळ) असे मयताचे नाव आहे. शहरातील रस्त्याच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणाचा हा अजुन एक बळी ठरला आहे. शहरातील अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गाला लागून सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून पावसाळ्यानंतर हे अधिक्रमण काढणार, अशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर करण्यात आले होते मात्र ते अजूनही काढण्यात येत नसल्याने दुसरीकडे निष्पाप नागरीकांचे बळी जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

भुसावळ टी पॉईंट ठरतोय मृत्यूचा सापळा
भुसावळ टी पॉईंट जवळ देखील रस्त्याच्या कडेस अतिक्रमणाचा वेढा असल्याने व वाहने थांबत असल्याने हा चौक मृत्यूचा सापळा ठरत आहे. गुरुवारी सकाळी याच प्रत्यक्ष अनुभव एका 50 वर्षीय इसमाचा बळी जाऊन समोर आला आहे . गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भुसावळकडून ट्रक (एम.एच. 30 ए.बी.4934) हा यावलला येत असताना भुसावळ टी पॉईंटवर येथील सरस्वती विद्यालयाजवळील रहिवासी दिलीप बाबुराव बिरारी (53) हे रस्याने चालत असताना ट्रकने त्यांना धडक दिली व ते चाकाखाली आले. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर भुसावळ येथील आरोग्य वाहिनी डॉक्टर अंशीजा पाटील, चेतन भोईटे यांनी जखमीस तत्काळ जळगावला उपचारासाठी हलवले. उपचार सुरू असताना दहा वाजेच्या सुमारास त्यांचा जळगाव येथे मृत्यू झाला. भुसावळ टी पॉइंटवर वळण असल्याने आणि शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावल पोलिसात अपघाताची खबर प्रकाश मधुकर बिरारी दिल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर हवालदार संजय तायडे करीत आहेत.