भरधाव ट्रकच्या धडकेत मोहाडीतील 13 वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीला दिलेल्या धडकेत मोहाडीतील 13 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी मोहाडी गावाजवळील लांडोरखोरी उद्यानाजवळ घडला. सुजय गणेश सोनवणे (13, मोहाडी, ता.जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली तर पोलिस प्रशासनाने धाव घेत दोन्ही वाहने जप्त केली आहेत.

दुचाकीला धडक दिल्याने बालकाचा मृत्यू
मोहाडी गावातील सुजय गणेश सोनवणे (13, मोहाडी, ता.जळगाव) हा सेंट टेरेसा शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेत होता व बुधवारी शाळा सुटल्यानंतर राजू गवळी हा त्यास दुचाकी (एम.एच.19 डी.एम.111) ने गावाकडे आणत असताना गावाजवळ असलेल्या उताराजवळ भरधाव ट्रक (एम.एच.28 बी.7703) ने धडक दिल्यानंतर सुजय हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली. जिल्हा परीषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परीषद सदस्य पवन सोनवणे आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.