भरधाव ट्रकच्या धडकेत रेल्वे गँगमन जागीच ठार

0

भुसावळ (प्रतिनिधी) – भरधाव ट्रकने दुचाकीला समोरून धडक दिल्याने रेल्वे गँगमनचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयापुढील पंजाब खालसा ढाब्याजवळ बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. संजयकुमार रतीलाल सोनवणे (33, शांती नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाल्याचा संशय आहे. अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या खाली उतरला तसेच वीज कंपनीच्या दोन ते तीन पोलवर धडकल्याने पोल जमिनीपासून निखळल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. तालुका पोलिसांनी ट्रकसह चालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाचे जळगाव येथे शव विच्छेदन झाले.

जम्मू काश्मिरातील आरोपी ट्रक चालकास अटक
अपघातानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुरेश वैद्य, गजानन काळे, राजेंद्र पवार आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालक अब्दुल वाहेद खान गुलाब नबी (रा.प्राट, सुंदरबेली, जि.राजुरी, जम्मू काश्मीर) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत सोनवणे यांच्या मृतदेहावर जळगाव येथे शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी, पाच वर्षीय मुलगी असा परीवार आहे.

कर्तव्यावर जाताना गँगमनवर काळाची झडप
शहरातील शांती नगरातील रहिवासी असलेले संजयकुमार सोनवणे (33) हे असोदा येथे गँगमन म्हणून सेवेस आहेत. सकाळी आठ वाजेची ड्युटी असल्याने ते घरून सकाळी पावणेसहा वाजता डबा घेऊन निघाले दुचाकी (एम.एच.19 बी.ई.2567) ने निघाले मात्र क्रुर काळाने अवघ्या 15 मिनिटातच क्रुर काळाने त्यांच्यावर झडप घातली. जळगावकडून येणार्‍या भरधाव ट्रक (जे.के.01 ए.ए.6227) ने जोरदार धडक दिल्याने सोनवणे यांच्या डोक्याला जबर फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचे पुढील चाकू तुटून काही अंतरावर जावून पडले तर भरधाव ट्रक अपघातानंतर रस्त्याच्या खाली उतरल्याने पंजाब खालसा हॉटेलजवळील दोन ते तीन इलेक्ट्रीक पोलचे नुकसान झाले.