भरधाव ट्रकने उडवल्याने वृद्धेचा मृत्यू ; यावल शहरात अतिक्रमणामुळे अपघात

0

यावल- शहरातील बुरुज चौकात अतिक्रमणाने एका वयोवृद्ध महिलेचा बळी घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. जिजाबाई शांताराम पाटील (75, रा.महाजन गल्ली) असे मृत वयोवृद्धेचे नाव आहे. जिजाबाई या रस्ता ओलांडत असताना ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारासाठी जळगाव येथे हलवत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. यावल शहरातून बुरूज चौकातून चोपड्याकडे केळीने भरलेला ट्रक (यू.पी. 76 के. 9245) जात असताना त्याचवेळी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिजाबाई या रस्ता ओलांडत असताना ट्रकने धडक दिली. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना 108 वाहनाद्वारे डॉ. वसीम शेख व चंद्रकांत ठोके यांनी उपचाराकरिता जळगाव येथे हलविले असता भुसावळच्या तापी पुलावर जिजाबाई यांची प्राणज्योत मालावली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. दिवाळीत जिजाबाई यांचे अपघाती निधन झाल्याने पाटील यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान बुरुज चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम पुढाकार घेणार का? असा संतप्त नागरीकांनी उपस्थित केला आहे.