मुक्ताईनगर : दुध वाहतूक करणारा टँकरमध्ये बिघाड झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास या टँकरमधून दुध टाकून दुसर्या टँकरमध्ये टाकण्याचे काम सुरू असतानाच भरधाव टाईल्स वाहतूक करणार्या ट्रकने दोन्ही वाहनांना जबर धडक दिल्याने पाच जण जागीच ठार झाले. शुक्रवार, 13 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावजवळ हा अपघात झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.
भीषण अपघातात पाच जागीच ठार
राष्ट्रीय महामार्गावर घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध हलविण्याचे काम सुरू असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने दोन्ही टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालकाची धूम
शुक्रवारी पहाटे सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले तर ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र आम्ही त्याचा पाठलाग करून पुढील एका ढाब्यावरून त्याला ताब्यात घेतले. त्याचा जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे निरीक्षक शंकर शेळके म्हणाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सर्व मयत हे धुळे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचेही पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी सांगितले.
अपघातामुळे वाहतूक ठप्प
अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे.