[व्हिडीओ] भरधाव ट्रालाच्या धडकेत पिंपळनेरचा महेंद्रा पीकअप चालक ठार

0

साक्री शहराजवळ अपघात ; बसला ओव्हरटेक करताना ट्राला धडकला

साक्री- नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री शहराजवळील अमित प्लाझासमोर उभ्या असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या महेंद्रा पीकअप जीपवर ट्रॉला धडकून झालेल्या अपघातात पीकअप चालक ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 7.55 वाजता घडली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती़ या अपघातात पीकअप चालक सुनील शांताराम मुसळे (32, रा.यशोदा नगर, पिंपळनेर) हा जागीच ठार झाला.

रस्त्यावर बस थांबल्याने अपघात
महामार्गावरील अमित प्लाझासमोर प्रवाशांना उतरवण्यासाठी बस थांबली असताना धुळ्याकडून साक्रीकडे जात असलेला भरधाव ट्रॉला (जी.जे.5-7064) हा समोरून येणार्‍या महेंद्रा पीकअप जीप (एम.एच.47 ई.901) वर धडकल्याने जीप चालक सुनील मुसळे हा जागीच ठार झाला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प होवून मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. विशेष म्हणजे अपघातस्थळी रस्त्यावर बसची वाट पाहत असलेला प्रवाशाने समयसूचकता दाखवल्याने तो बचावला तर पीकअप जीपला धडक दिल्यानंतर ट्राला अमित प्लाझाच्या फलकावर धडकल्याने फलकाचे नुकसान झाले. अपघाताचे वृत्त कळताच साक्री पोलिस ठाण्याचे दीपक विसपुते, परमेश्‍वर चव्हाण, चेतन गोसावी, गिरधर पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.