जळगाव – महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सने कंपनीतून पाळधीकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला बहिणाबाई चौधरी विद्यापिठाच्या प्रवेशद्वारासमोर धडक दिली. पाळधी येथील कोळीवाड्यातील रहिवासी असलेले कैलास हिलाल मगरे (वय-50) रा. विरदेल ह.मु. पाळधी ता.धरणगाव यांचा जागीच मृत्यू झाला. मयत कैलास मगरे हे बांभोरी येथील बॉस चेसीस कंपनीत एसपीडी विभागात कामाला आहे. बुधवारी दुपारी 2 वाजेनंतर सुट्टी झाल्यावर मगरे हे धरणगाव तालुक्यातील पथराळ येथील एका सहकार्याच्या दुचाकीने कंपनीतून पाळधी येथे जाण्यासाठी निघाले होते.
धुळ्याकडून जळगावकडे येत असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक (जीजे 07, वायझेड 2449) ने विद्यापिठाच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात मगरे हे लक्झरीच्या मागच्या चाकात आल्याने जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार सहकारी जखमी झाला. चालकालापाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले तर ट्रॅव्हल्स आणि महिलांना तालुका पोलिसात आणण्यात आले असून चालकाविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.