वाघोली । पुणे-नगर महामार्गावर भरधाव डंपरने सात चारचाकींना धडक दिल्याची घटना बकोरी फाटा येथील लेक्सीकॉन स्कूल समोर रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. डंपरने एका चारचाकीला दीडशे मीटर फरफटत नेले असून तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत माहिती अशी की, बकोरी फाटा येथे दुपारी सव्वा एकच्या सुमारास डंपरचालक लोणीकंदहून वाघोलीच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. लेक्सीकॉन स्कुल समोर डंपरने चार गाड्यांना धडक दिली. वेगात असल्याने डंपर रस्ता दुभाजक ओलांडून महामार्गाच्या दुसर्या बाजूला गेला. दुसर्या बाजूला तीन चारचाकींना धडक दिली व त्यातील एका चारचाकीला डंपरने दीडशे मीटरपर्यंत फरफटत नेले. यामध्ये एका दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला आहे.
दहा ते बाराजणांना दुखापत
अपघातामध्ये एका मुलीला गंभीर दुखापत झाली असून इतर दहा ते बारा जणांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने महामार्गावरील चारचाकी गाड्या बाजूला घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. अपघात भीषण स्वरूपाचा असतानाही सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघात करणारा डंपरचालक दारूच्या नशेत असल्याच्या स्थानिक नागरिकांनी सांगितले तर डंपरचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.